![]() |
मुंबई बंदर हे फार पुर्वीपासून भारताचे प्रमुख प्रवेशव्दार मानले जाते. मुंबई बंदराने राष्ट्रीय अर्थव्यवस्था, व्यापार, वाणिज्य आणि विशेषतः मुंबई शहराच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सागरी व्यापाराच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून बंदराने हे स्थान प्राप्त केले आहे. परंपरागत सामान्य मालाची हाताळणी करण्याकरिता बंदराची रचना केली असताना, गेल्या काही वर्षांत बंदराने बदलत्या सागरी व्यापाराच्या बदलांना आणि ब्रेक बल्कपासून युनिटायझेशन/पॅलेटायझेशन आणि कंटेनरायझेशनपर्यंत सर्व मालाच्या स्वरुपांना स्विकारले आहे. |
याशिवाय, पीओएल आणि रसायने हाताळण्यासाठी विशेष धक्के देखील विकसित केले आहेत. अनेक दशकांपासून मुंबई बंदर हे भारताचे प्रमुख बंदर होते. इतर बंदरांचा विकास होत असतानासुद्धा , आजही देशातील प्रमुख बंदरांव्दारे हाताळल्या जाणा-या एकूण सागरी व्यापाराचा 8.61 टक्के वाटा मुंबई बंदराचा आहे. देशातील प्रमुख बंदरांव्दारे हाताळल्या जाणार्या एकूण पीओएल (POL) वाहतुकीच्या 16.07 टक्के हिस्सा मुंबई बंदराचा आहे. आपल्या प्रदीर्घ इतिहासात मुंबई बंदराने सागरी व्यापारातील अनेक बदलांना समर्थ पणे तोंड दिले आहे. आजही शेजारील बंदरे आणि खाजगी बंदरे यांच्याशी स्पर्धा, बदलते मालवाहतुकीचे स्वरूप, अंगीभूत भौतिक अडचणी आणि कामगार केंद्रित कामाचे स्वरुप इत्यादी आव्हानांचा मुंबई बंदर खंबीरपणे सामना करत आहे. तरीही मुंबई बंदर हे व्यापाराला फायदेशीर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. |